पीक विमा योजना

पीक विमा योजना: आपल्या शेतकऱ्यांसाठी खरंच वाली आहे का नुसता दिखावा?

आपल्या देशात शेती म्हणजे काय, नुसतं धान्य पिकवणं नाही. ती आपल्या मातीची माया आहे. आपला शेतकरी दिवस रात शेतात कष्ट करतो, तेव्हा कुठं आपल्या पोटात अन्नाचा दाणा जातो. पण निसर्गाचा भरोसा नाही आणि बाजारात काय भाव मिळेल याचा पण काही नेम नाही. मग त्याच्या सगळ्या कष्टावर पाणी फिरण्याची भीती असते. याच संकटातून आपल्या बळीराजाला थोडा आधार मिळावा म्हणून सरकारने पीक विमा योजना काढली. आता ही योजना खरंच आपल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात आहे की नुसता कागदावरचा फुगा, याच गोष्टीवर आपण जरा बोलूया.

खरं बोलायचं तर, पीक विमा योजना आणली ती चांगली गोष्ट झाली. कधी अवकाळी पाऊस आला, कधी दुष्काळ पडला, कधी गारपीट झाली किंवा किडी-रोगांनी धुमाकूळ घातला, तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं. अशा वेळी पीक विम्यामुळे त्याला थोडा तरी आधार मिळतो. त्याचे गुंतवलेले पैसे एकदम वाया जात नाहीत आणि त्याला पुन्हा उभं राहायला थोडी मदत होते.

पण आता यात खोडी काय आहे, ते पण जरा बघा. सगळ्यात मोठी पंचायत म्हणजे या योजनेची बातमी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नीट पोहोचतच नाही. अजून सुद्धा बरेच शेतकरी असे आहेत, ज्यांना पीक विमा काय असतो, तो कसा भरायचा आणि त्याचे फायदे काय आहेत, याचर पत्ताच नाही. शहरात बसलेले साहेब लोक योजना बनवतात खरं, पण ती आपल्या खेड्यातल्या माणसांपर्यंत जायला खूप वेळ लागतो किंवा जातच नाही.

दुसरी म्हत्वाची गोष्ट म्हणजे विमा कंपन्यांचा धंदा. बहुतेक वेळा असं होतं की नुकसान झाल्यावर शेतकऱ्याला वेळेवर पैसा मिळत नाही. कधी कागदपत्रांची फाईल घेऊन बसा, तर कधी नुकसानीचा अंदाज नीट येत नाही. गरीब बिचारा शेतकरी चकरा मारून थकून जातो आणि त्याला शेवटी नाईलाजाने सोडून द्यावं लागतं. कंपन्यांसाठी हा नुसता आकड्यांचा खेळ असतो, पण शेतकऱ्यांसाठी ती त्याच्या जिवाची गोष्ट असते.

आणखी एक बोलायचं म्हणजे विमा भरायची रक्कम. लहानसहान आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ही रक्कम भरणं पण जड जातं. सरकारने थोडी मदत केली असली, तरी खूप जणांना ते परवडत नाही. मग ते बिचारे या योजनेपासून दूर राहतात आणि संकटाच्या वेळी आणखीनच लाचार होतात.

आता या सगळ्यावर काही इलाज नाही का? नक्कीच आहे. पहिलं काम म्हणजे पीक विमा योजनेची माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचायला पाहिजे. यासाठी गावोगावी सभा घ्यायला पाहिजेत. नुसती पोस्टर्स लावून किंवा कागदं वाटून काय उपयोग, शेतकऱ्यांशी डायरेक्ट बोलायला पाहिजे. त्यांच्या भाषेत, त्यांच्या पद्धतीने त्यांना या योजनेची माहिती द्यायला पाहिजे.

दुसरं म्हणजे विमा कंपन्यांनी आपला कारभार एकदम सरळ आणि लवकर करायला पाहिजे. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी नवीन मशीन वगैरे वापरायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला लवकर आणि बरोबर भरपाई मिळेल. उगाच त्याला हेलपाटे मारायला लावू नये.

तिसरं म्हणजे गरीब आणि लहान शेतकऱ्यांसाठी विमा भरायची रक्कम जी एक रुपये आहे ती आता बंद करायच्या पण चर्चा चालू आहेत. असे झाले तर शेतकरी अजून थोडा गाळात जाणार हे मात्र नक्की.

पीक विमा योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी एक मजबूत आधार बनू शकते, पण त्यासाठी तिचं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे. नुसत्या गप्पा मारून किंवा कागदं रंगवून काय फायदा? खरंच जर आपल्याला आपल्या बळीराजाला वाचवायचा असेल, तर या योजनेत बदल करायला पाहिजे आणि ती त्याच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. नाहीतर ही योजना फक्त कागदावरच छान दिसेल आणि खरं पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी ती एक ताप होईल.

म्हणून सरकारने आणि विमा कंपन्यांनी आता तरी नीट विचार करावा आणि पीक विमा योजनेला खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आधार बनवावा, एवढीच आमची मागणी. कारण शेवटी, आपला शेतकरी सुखी तर आपण सगळे सुखी!

Leave a Comment